---Advertisement---
भुसावळ : भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीचा छडा पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघड केला आहे. तपासात उघड झाले की, फिर्यादीच्या कंपनीतच काम करणारा ड्रायव्हर शाहीद बेग हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यासह एकूण सहा आरोपीना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. २८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाला फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे आपल्या कंपनीचे (रॉयल कंपनी) २५.४२ लाख रुपये घेऊन मोटरसायकलवरून घरी जात असताना, खडके शिवारातील कच्च्या रस्त्यावर तिघा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गाडीला धडक दिली. यानंतर त्यांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अटक केलेले आरोपी
शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) मुख्य सूत्रधार ड्रायव्हर, मुजाहीद आसीफ मलीक (वय २०, रा. भुसावळ), मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, रा. भुसावळ), अजहर फरीद मलक (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर), अमीर खान युनुस खान (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर), ईजहार बेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर) सर्व आरोपींना न्यायालयाने ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका), राहुल गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा), राहुल वाघ (बाजारपेठ पो.स्टे.) यांच्या पथकांनी केली. तपासात अनेक पोलीस अधिकारी व अंमलदारांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
तपासात उघड झालेले सूत्र
घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. चौकशीत फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग संशयाच्या भोवऱ्यात सापडला. अखेर चौकशीत त्यानेच लुटीचा कट रचल्याचे कबूल केले. शाहीद बेगनेच आपल्या साथीदारांना पैशांच्या वाहतुकीची माहिती दिली होती. त्यानंतर मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांनी हा कट रसलपूर (ता. रावेर) येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. या तिघांनी प्रत्यक्ष लूट केली.









