Bhusawal Crime News : दरोड्याचा डाव उधळला : सात संशयितांना बेड्या

भुसावळ : भुसावळ-नागपूर महामार्गावरील राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या प्रयत्नात आलेल्या भुसावळसह मध्य प्रदेशातील परप्रांतीयाच्या कुविख्यात टोळीला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतुसे, पाच तलवारी, चार चाकू, मिरची पूड व दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे, ही कारवाई रविवारी (८ डिसेंबर) रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील आलिशान वॉटर पार्कजवळ करण्यात आली. दरम्यान, संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या आरोपींना अटक

शेख इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख (२१, आठ खोली भारत नगर, भुसावळ), अरबाज शेख शबीर (३०. तेली गल्ली, दीनदयाल नगर, भुसावळ), शेख मुजम्मील शेख मुज्जू हकाम (३०, तहा नगर, फैजपूर, ता.यावल), शेख शोएब शेख इक्बाल (२५, फैजपूर, ता. यावल), आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर (२०, खंडवा, मध्य प्रदेश), राहुल उर्फ चिकू राम डेंडवाल (२३, खंडवा,मध्य प्रदेश), मोहित जितेंद्र मेलावंस (१९, खंडवा, मध्य प्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई दरोड्याचे साहित्य जप्त भुसावळ-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर संशयित सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहल वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. रविवारी रात्री सव्वा वाजेनंतर यंत्रणेने महामार्गावरील आलिशान वॉटर पार्कजवळून संशयितांना ताब्यात घेतले.

अटकेतील आरोपींच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे. चार जिवंत काडतुसे, पाच तलवारी, चार धारदार चाकू, मिरची पूड, लोखंडी फायटर मिळून ४८ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

आरोपी मॉडेलसह चौघांविरोधात लूट, आर्म अॅक्टचे गुन्हे

आरोपी मॉडेल रसूल शेख विरोधात बाजारपेठ पोलिसात जबरी लूट, आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल आहे तर अरबाज शेख शब्बीर विरोधात भादंवि ३०७ अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे, शिवाय फैजपूर येथील शेख मुजम्मील शेख मुज्जू हकाम व शेख शोएब शेख इक्बाल यांच्याविरोधात आर्म अॅक्टसह भादंवि ३०७ अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यांच्यापथकाने केली कारवाई

ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, हवालदार महेश चौधरी, नाईक सोपान पाटील, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई भूषण चौधरी, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई राहुल वानखेडे आर्दीच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.