---Advertisement---
जळगाव : शहरी लोक बोलीतून संवाद साधण्यात संकोच करतात, बरे ते प्रमाण मराठीही व्यवस्थित बोलत नाहीत. त्यांच्या तोंडी येणारे वाक्यही इंग्रजी वळणाचे आहे. तेव्हा ग्रामीण लोकच बोलीभाषेचे तारणहार आहेत. ग्रामीण बोलीतून व्यक्त होणाऱ्या आमच्या माय बहिणाबाईचा आम्हांला सार्थ अभिमान राहील, असे प्रतिपादन १८ व्या बहिणाबाई सोपानदेव खानदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागूल यांनी केले.
पवन चारिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट, कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे बहुउद्देशीय संस्था, युवा विकास फाउंडेशन यांच्या सौजन्याने कविवर्य स्वर्गीय पुरुषोत्तम नारखेडे (मालतीकांत) यांच्या स्मृती प्रित्यर्थ १८ वे बहिणाबाई सोपानदेव खान्देश खान्देस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १३ जुलै, रविवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. संमेलनात जळगावसह धुळे, नंदुरबार, वर्धा जिल्ह्यातील कवींनी आपल्या सुमासदार कविता सादर केल्या. बोली भाषेतील कवितांनी रसिकांची उस्फुर्त दाद मिळाली.
---Advertisement---

सकाळी संमेलनाचे उद्घाटन आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विविध भजने, अभंगातून पालखी, दिंडी सोहळा साजरा झाला. ग्रंथ दिंडी घेऊन मान्यवरांनी परिसरात फेरी काढली. यानंतर उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई – सोपानदेव चौधरी- मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना प्रदान करण्यात आला. नंतर डॉ. अरविंद नारखेडे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खानदेशातील कवी-कवयित्रीं च्या स्वलिखित कवितांचे प्रदर्शन ‘पोस्टर पोएट्री’ चे उद्घाटन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
मंचावर संमेलन अध्यक्ष डॉ. फुला बागुल, उद्घाटक आ. सुरेश भोळे (राजूमामा), प्रमुख पाहुणे म्हणून खा. स्मिताताई वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, माजी नगरसेवक अमित काळे, माजी संमेलनाध्यक्ष संजिवकुमार सोनवणे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून पुष्पाताई साळवे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे तसेच प्रमुख अतिथी निवृत्त डी. वाय. एस.पी. राजेंद्र रायसिंग, ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल, निवृत्त प्राचार्य आप्पासाहेब निळकंठ गायकवाड, लेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रवीण भोळे, बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात प्रा. उत्तम सुरवाडे यांनी साहित्य संमेलन भरवून चिरंतन ठेवणाऱ्या डॉ. विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे यांच्या कार्याचा गौरव करून दिला.
अहिराणी भाषा टिकवणे सर्वांचे कर्तव्ये – खासदार स्मिता वाघ
शब्द सुचतात तोच साहित्यिक असतो. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणच्या साहित्यिकांनी एकत्र येऊन मोठ्या स्वरूपात अहिराणी भाषेला पुढे यायला हवे, अशी अपेक्षा खासदार स्मिताताई वाघ यांनी या संमेलनात व्यक्त केली.
संस्कृती जोपासली गेली पाहिजे – आ. सुरेश भोळे
शिक्षण कितीही असले तरी आपली संस्कृती जोपासण्यात आली पाहिजे. पुरुषोत्तम नारखेडे उपाख्य कवी मालतीकांत यांनी सुरू केलेला हा बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी साहित्य संमेलनाचा प्रवाह आज अठराव्या पायरीवर येऊन पोहोचलाय याचा आनंद आहे. अशा संमेलनातूनच आपल्या साहित्य आणि संस्कृतीचे जगाला ज्ञान होते, असे गौरवोद्गार आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी काढले.
विविध सत्रात कवींनी व्यक्त केल्या भावना
संमेलनात दुपार सत्रात “आणि ‘ती’ लिहिती झाली…” या विषयावर परिसंवाद कार्यक्रम झाला. त्यात संध्याताई महाजन यांनी तिच्या ‘ती’ बोलू लागली पासून ‘ती’ लिहू लागली इथवरचा प्रवास अतिशय विलोभनीय अंदाजात मांडला. तर पोर्णिमाताई यांनी तिच्या वेदनेतून आर्त कविता आणली. सत्राचे अध्यक्ष ऍड. विलास मोरे हे उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विजय लुल्हे यांनी केले. त्यानंतर कथाकथन या चौथ्या सत्रात प्रा. गोपीचंद धनगर आणि संस्कृती पवनीकर यांनी सहभाग नोंदविला.संस्कृतीने डॉ. मंजुषा पवनीकर लिखित कथाकथन विषयावरील ‘ते दहा नि’ कथा सादर केली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी रंगकर्मी दिलीप जाने हे होते.काळ बदलत असला तरीही कथाकथन आजही प्रिय आहे. आणि कथाकथन विध्यार्थी विकासात पूरक आहे, असे दिलीप जाने यांनी यावेळी नमूद केले. या सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रकाश पाटील यांनी केले.
यानंतर ‘बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवास’ या सत्रात जि.प.शाळा, सांगवी खुर्द येथील शिक्षिका जयश्रीताई काळवीट यांनी सांगितले की, बालकांची वाचन संस्कृती वाढणे हा बोलण्याचा विषय नसून कृतीत आणण्याचा विषय आहे, असे सांगतिले. यासह या सत्रात सुधीलकुमार शिंदे व रवींद्र शिंदे यांनीही सहभाग नोंदविला. या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका मायाताई धुप्पड या होत्या. त्या म्हणाल्या की, खानदेच्या साहित्य चळवळीत बहिणाबाई चौधरी, सोपानदेव, साने गुरूंनी यांचा बहुमूल्य वाटा आहे. साहित्य चालवत जोपासण्याचे काम विलास नारखेडे करीत असल्याचा उल्लेखही त्याही यावेळी केला. सत्राचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुनीता येवले यांनी केले.
विविध विषयांवर कवितांचे सादरीकरण
या कवी संमेलनात डॉ.अ.फ.भालेराव, ज्योती राणे, किशोर नेवे, शैलजा करोडे, हरुन पटेल, रमेश धुरंधर, प्रविण लोहार, आशा सांळुखे, अॅड. मुकुंद जाधव, डॉ. संजय पाटील, ज्योती वाघ, संतोष साळवे, मंजुषा पाठक, संध्या भोळे, शितल पाटील, मनोहर तेजवाणी, प्रकाश पाटील, प्रफुल्ल पाटील, भिमराव सोनवणे, डी डी पाटील, जयश्री काळवीट, सुनिता येवले, गंगा सपकाळे, निंबा बडगुजर, विजय लुल्हे, इंदिरा जाधव, चित्रा पगारे, शहानूर तडवी आदींनी कवींनी विविध विषयांवर कवितांचे सादरीकर करून उपस्थितांचे मने जिंकली. तर समारोपीय कविता प्रा. संध्या महाजन यांनी सादर केले.
असे आहेत पारीत ठराव
या संमेलनात विविध ठराव मांडण्यात आले असून ते ठराव मंजूर करण्यात आलेले आहे. बदलत्या काळात मराठी भाषा, भाषिक व साहित्य क्षेत्रात वाढ होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. साहित्य व कवी संमेलनासाठी संख्यात्मक वाढ होण्यापेक्षा गुणात्मक वाढ होण्याचाही विचार व्हावा. शासनातर्फे साहित्य, काव्य क्षेत्रातील निधन झालेल्या स्मुतीना श्रद्धांजली वाहण्यात यावी. नवीन ग्रंथालयांना मान्यता द्यावी व त्याच्यातील कर्मचाऱ्यांना चांगले वेतन द्यावे. पुस्तके खरेदी-विक्री करतांना व छपाई व कागद खर्चामध्ये जीएसटी मधून वगळावे. मराठी भाषिक शाळांना शासकीय योजनेमध्ये प्राधान्य द्यावे. राज्यातील विविध बोलीभाषा संवेदना द्यावी. बोलीभाषा विकास संख्या स्थापन करावी. साहित्यिक व काव्य क्षेत्रातील पुरस्कारांच्या संख्येत वाढ करावी, हे ठराव संमेलनात मांडण्यात आले.
संमेलनातील कविसंमेलन हे खान्देशातील प्रतिनिधित्व कारणाने आणि ज्येष्ठ कवींसोबत नव्या पिढीतील कवींना व्यासपीठ देणारे आहे, असे प्रतिपादन कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.बी. एन. चौधरी यांनी केले. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण व कवींच्या सहभागाचे सन्मानपत्र प्रदान करण्यात आला. यावेळी या साहित्य संमेलनात खान्देशातील बहुसंख्येने साहित्यिक, कवी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी निमंत्रक डॉ. विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे, तुषार वाघुळदे, कार्याध्यक्ष विजय लुल्हे, आयोजक रघुनाथ राणे, डॉ. संजय पाटील, प्रा. संध्या महाजन, ज्योती राणे, साधना लोखंडे तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.