जळगाव : शहरात पाणीपुरवठा करणारी जुनी पाईप लाईन खोदून त्याची चोरी केली. त्यानंतर या बिडच्या पाईपांच्या १० गाड्या भरुन त्या भंगार विक्रेता जब्बार कादर शेख (रा. जळगाव) यांच्या स्वाधीन केल्या. जब्बार शेख यांनी यांनी ५० पैसे ते एक रुपया कमिशनवर ही पाईप लाईनची चाळीसगाव येथील भंगार व्यावसायिक शब्बीर मंहमद फकीर महंमद शेख यांना विक्री केली. तसेच त्या मोबदल्यात साडेसतरा लाख रुपये संशयितांनी दिले. त्यानुसार कुंदन पाटील याला आठ लाख रुपये तर गुन्ह्यातील पोलिसांना हवा असलेला संशयित निरंजन पाटील याला दहा लाख असे मिळून दोघांनी साडेसतरा लाख रुपये घेतले. ही पोलीस तपासातील माहिती सोमवारी, १६ रोजी तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.
पाईपलाईन व चोरीच्या भंगार साहित्याची मालेगाव, पाचोरा, अकोला पाठोपाठ चाळीसगाव येथेही संशयितांनी विक्री केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सुनील महाजन यांचा सुपरवायझर कुंदन पाटील, भंगार ठेकेदार सादीक खाटीक, अक्षय अग्रवाल, भावेश पाटील यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी त्यांना न्या एम. एम. बढे यांच्या न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते.
जळगाव मनपाची गिरणा पंपिंग रोड तसेच जलशुद्धीकरण केंद्रासह सावखेडा रोड व दापोरा परिसरात शहर पाणीपुरवठ्याची बिड पाईपांची पाईप लाईन जमिनीत होती. गिरणा
पंपिंग रोड येथील अंदाजे एक हजार मीटरपर्यंत तसेच जुलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या सावखेडा रोड येथे २६० मीटरपर्यत, दापोरा परिसरातील सुमारे ५० मीटरपर्यंत विडच्या धातूवी पाईप लाईन खोदून त्याची संशयितांनी कट रचून विक्री केली. तसेच जलशुद्धीकरण केंद्रावरील भंगार साहित्याचीही विक्री केली. एक कोटी सहा रुपयांच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पोलिसांच्या ताब्यातील अक्षय मनोज अग्रवाल (वय ३०, रा. भवानीपेठ, संशयित भावेश भानुदास पाटील (वय २०) तसेच कुंदन भानुदास पाटील (वय ४२, रा. दोन्ही मेहरुण) यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवार, १६ रोजी संपली. त्यामुळे सोमवारी न्या. एम. एम. बडे यांच्या न्यायालयात तपासाधिकारी महेश शर्मा यांनी तिघांना हजर केले. त्यावेळी न्यायालयात त्यांनी ही माहिती दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी, तर कुंदन पाटीलतर्फे अॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.
५० पैसे ते एक रुपये कमिशन दिली दलाली
तपासाधिकाऱ्यांनी तिघा संशयितांना पोलीस कोठडी मिळण्याची का आवश्यकता आहे हे मांडताना स्पष्ट केले की, बिडचे पाईप विक्री करून कुंदन पाटील याने व्यापाऱ्याकडून आठ लाख रुपये घेतले असून, ही रक्कम हस्तगत करावयाची आहे. संशयितांनी येथील भंगार व्यावसायिक जब्बार कादर शेख यांच्यामार्फत जुने पाईप भंगारमध्ये विक्री केली. यासाठी जब्बार यांना ५० पैसे ते एक रुपया रकमेवर कमिशन ठरविले. जब्बार यांनी चाळीसगाव येथील भंगार व्यापारी शब्बीर मंहमद शेख यांच्याशी संपर्क साधून १० गाड्या जुने पाईप भरुन विक्री केली. त्या मोबदल्यात भंगार खरेदी विक्रेता शब्बीर महमद (चाळीसगाव) यांनी उर्वरित रक्कम तीन लाख रुपये पोलिसांच्या स्वाधीन केली.
या व्यवहारातील आठ लाख रुपयांची रोकड संशयित कुंदन पाटीलकडून तर दहा लाख रुपयांची रोकड फरार निरंजन पाटील यांच्याकडून हस्तगत करायची आहे. असे सांगून तपासाधिकाऱ्यांनी तपासासाठी ताब्यातील संशयितांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली.
मनपा इमारतीच्या खिडक्यासह फ्रेमचीही चोरी
गिरणा पंपिंगनजिक मनपाच्या मालकीची इमारत आहे. या इमारतीच्या तब्बल ४५ खिडक्यांचे फ्रेम तसेच लाकडाचे तुकडेही संशयितांनी चोरून नेत्याचा प्रकार तपासातून समोर आला आहे हे साहित्य मोहंमद अफसर अलाउद्दीन सुलेमानी (रा. मास्टर कॉलनी) यांना विकल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यावसायिकाकडून ४० हजाराची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. पाईप लाईन चोरीप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन, तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात एक असे तीन गुन्हे आतापर्यंत दाखल झाले आहेत. तपासात बिडचे पाईप व भंगार साहित्य विक्री ही मालेगाव, पाचोरा, अकोला, जळगाव तसेच चाळीसगाव येथील भंगार व्यापाऱ्याला विक्री केल्याचे समोर आले आहे.