सातपुड्याच्या ‘आमू आखा एक से’ स्टॉलला दिल्लीत विशेष पसंती; वेधले सर्वांचे लक्ष

नंदुरबार : प्रगती मैदान, नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित ग्रामीण भारत महोत्सवात सातपुड्यातील उत्पादने देशभरातून आलेल्या मान्यवरांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. यामध्ये विशेषतः धडगाव येथील ‘आमू आखा एक से’ या शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्टॉलने प्रमुख आकर्षण ठरले. महोत्सवाचे आयोजन नाबार्ड आणि वित्त सेवा विभागाने केले होते.

हा सहा दिवसीय महोत्सव ४ ते ९ जानेवारी दरम्यान पार पडला. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि राज्यमंत्री पंकज चौधरी या प्रसंगी उपस्थित होते. महोत्सवात १८६ स्टॉल्समध्ये देशातील ग्रामीण व आदिवासी भागातील जीआय उत्पादने, हस्तकला, सेंद्रिय उत्पादने आणि महिला बचतगटांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात आले.

सातपुड्यातील उत्पादनांचे वैशिष्ट्य

‘आमू आखा एक से’ च्या स्टॉलवर खालील उत्पादने मांडण्यात आली होती. जीआय नामांकित आमचूर व आमचूर पावडर
तूरडाळ, उडीदडाळ आणि मठडाळ, हातसडीचे लाल तांदूळ, नंदुरबारची जीआय नामांकित मिरची पावडर,
ही सर्व उत्पादने १००% सेंद्रिय व रासायनिक प्रक्रियामुक्त असल्याने त्यांना मान्यवरांकडून विशेष पसंती मिळाली. महोत्सवातील सहभागी तज्ज्ञ, शेतकरी आणि केंद्र सरकारचे अधिकारी यांनी या उत्पादनांविषयी सविस्तर माहिती घेतली.

स्थानीय उत्पादकांचा गौरव

धडगावचे शेतकरी संचालक लालसिंग वळवी, आसिफ शेख, आणि यशपाल पटेल हे या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे सातपुड्याच्या उत्पादनांनी दिल्लीत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

सातपुड्याच्या उत्पादनांची भविष्यकालीन संधी

या महोत्सवामुळे सातपुड्यातील उत्पादकांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेंद्रिय व जीआय उत्पादने देशभरात पोहोचवण्याची संधी असून, या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भारत महोत्सव हा देशातील स्थानिक उत्पादकांच्या कौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ देण्याचे उत्तम उदाहरण ठरला आहे.