जळगाव मनपाकडून २०० कोटींच्या विशेष निधीची मागणी; मंजूर विकास योजनेतील जमीन संपादनामुळे वाढला आर्थिक ताण

---Advertisement---

 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेअंतर्गत जमीन संपादन प्रकरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक ताणातून मार्ग काढण्यासाठी मनपाने राज्य सरकारकडे सुमारे २०० कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी केली आहे. यासंदर्भात महापौर सौ. दीपमाला काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे, मंजूर विकास योजनेतील सार्वजनिक वापरासाठी राखीव जमिनींच्या संपादनासाठी देय मोबदल्यात मोठी वाढ झाली आहे. यामुळे महानगरपालिकेवर मोठा आर्थिक भार पडला असून, विद्यमान आर्थिक स्थितीत इतकी मोठी रक्कम अदा करणे कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


तसेच, संबंधित रक्कम वेळेत न भरल्यास मनपाच्या बँक खात्यांवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, रस्ते आदी अत्यावश्यक नागरी सेवांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
ही बाब केवळ आर्थिक नसून सार्वजनिक हिताशी संबंधित ‘पब्लिक इंटरेस्ट इमर्जन्सी’ असल्याचे नमूद करत, किमान २०० कोटी रुपयांचा विशेष निधी तातडीने मंजूर करून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, निधी उपलब्ध होईपर्यंत प्रशासकीय व आर्थिक अडचणी टाळण्यासाठी शासनाने तात्पुरत्या उपाययोजना व निर्देश द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे. या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---