त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची मारहाण; भाविकांचे कपडे फाटेपर्यंत लाथाबुक्क्यांचा मारा, भाविकांचा संताप…!

---Advertisement---

 

नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर येथे सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण केल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट दिसते. संबंधित भाविकाचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आल्याचे दृश्यांमध्ये आढळते. मंदिर परिसरातील इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. दुसऱ्या एका व्हिडिओमध्येही अशाच प्रकारे एका भाविकाशी गैरवर्तन करत मारहाण करण्यात आल्याचे दिसते.

सध्या सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. हजारो भाविक पहाटेपासूनच दर्शनरांगेत उभे राहत असल्याने व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. मात्र गर्दी नियंत्रणाच्या नावाखाली भाविकांशी अशा प्रकारचे गैरवर्तन होणे अयोग्य असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही काही वेळा सुरक्षा रक्षकांकडून उद्धट वर्तनाच्या तक्रारी झाल्याचे सांगितले जाते.

या घटनांमुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अद्याप मंदिर प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. संबंधित सुरक्षा रक्षकांवर काय कारवाई केली जाणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, “दर्शनासाठी तासन्‌तास प्रतीक्षा आणि मिळतोय लाथाबुक्क्यांचा प्रसाद,” अशा शब्दांत भाविकांनी संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. श्रद्धास्थानांमध्ये सुरक्षेची गरज असली तरी भाविकांच्या सन्मानाचे भान राखणे तितकेच महत्त्वाचे असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---