---Advertisement---
पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक विरह आणि मानसिक तणावातून एका तरुणाने फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच आपले जीवन संपवले, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव केशरी प्रसाद शाहू असे आहे. गुरुवारी (५ फेब्रुवारी) दुपारी सुमारे ४.३० वाजता ही घटना घडली. केशरी पिंपरी चिंचवडमधील एका भाजी मंडईतील पाण्याच्या टाकीवर गेला होता. त्याने आत्महत्येपूर्वी फेसबुक लाइव्हद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केशरी हा काही दिवसांपासून पत्नी आणि मुलीपासून वेगळा राहत होता. यामुळे तो मानसिकदृष्ट्या अत्यंत तणावात होता. फेसबुक लाइव्हमध्ये तो पत्नी-मुलीची आठवण काढताना भावूक झालेला दिसून आला. विरह सहन होत नसल्याचे सांगत त्याने लाइव्हदरम्यानच टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. फेसबुक LIVEमध्ये त्यानं वेदना व्यक्त केल्या आहे.
केसरीने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप:
या घटनेचा तपास भोसरी पोलीस करत आहेत. घटनास्थळी तीन पानांचे सुसाइड नोट सापडलीय. सुसाइड नोटमध्ये त्याने काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच लोकांनी पत्नीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यानं चिठ्ठीमध्ये केलाय. केशरीने सुसाइड नोटमध्ये लिहिलंय की, “मी पूर्ण शुद्धीत ही चिठ्ठी लिहीत आहे. माझ्या पत्नीला पळवून लावण्यात काही जणांचा सहभाग आहे. त्यांना तिचं सध्याचं ठिकाण माहिती आहे, असा माझा आरोप आहे. माझ्या आणि तिच्या वादाचा गैरफायदा घेऊन पत्नीला पळवून लावलंय. माझ्या मृत्यूस तेच जबाबदार असून मला न्याय हवाय. सोनं-चांदी घेतल्याचा आणि मला धमकावल्याचा आरोपही आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासलं नाही, याबाबतही तक्रार आहे. मला पत्नी-मुलीसोबत आयुष्य जगायचं होतं, मुलीवर माझं अपार प्रेम आहे. एक नंबर खोलीतील व्यक्तींवर संशय आहे”.
या प्रकरणाची भोसरी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, सुसाइड नोटमध्ये उल्लेख असलेल्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता आहे. पुढील तपास वेगाने सुरू आहे.
महत्त्वाची सूचना:
मानसिक तणाव, नैराश्य किंवा एकटेपणा जाणवत असल्यास मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे. आप्तस्वकीय, मित्र किंवा तज्ज्ञांशी बोला. गरज असल्यास मानसिक आरोग्य हेल्पलाईनशी संपर्क साधा.









