सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या शासनाच्या योजनांचे आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा लवकरच 100% अंगणवाडी इमारती असलेला राज्यातील पहिला जिल्हा होणार

जळगाव, दि. 20 मार्च – ग्रामीण भागातील आरोग्य, पोषण आणि जनजागृती यंत्रणा सक्षम करण्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून त्या शासनाच्या योजनांचे खरे आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.


छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, या महिला कर्मचारी खऱ्या अर्थाने फ्रंटलाईन वॉरियर्स असून त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना थेट घराघरात पोहोचतात. कोविडसारख्या कठीण काळातही त्यांनी जीवाची पर्वा न करता सेवा दिल्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदर अधिक वाढला आहे. शासन त्यांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असून त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.


पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमार्फत मागील दोन वर्षांत 231 अंगणवाडी इमारतींसाठी निधी देण्यात आला आहे. उर्वरित 150 अंगणवाड्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जळगाव जिल्हा शंभर टक्के अंगणवाडी इमारती असलेला राज्यातील पहिला जिल्हा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डीपीडीसी अंतर्गत 550 स्मार्ट अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली असून 200 केंद्रांना स्वयंपाकासाठी भांडी आणि 2179 केंद्रांना लहान मुलांसाठी ‘बनाना शेप’ बाक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच 350 मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या केंद्रांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.


कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या एक वर्षातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच तीन पर्यवेक्षिका, 19 अंगणवाडी सेविका, 19 मदतनीस आणि 15 आशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. वावडदे येथील शेतकऱ्याला ‘आदर्श शेतकरी’ पुरस्कार देण्यात आला.


खासदार स्मिताताई वाघ यांनीही सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या या ग्रामीण प्रशासनाचा कणा असल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.


कार्यक्रमास आमदार राजू मामा भोळे, अप्पर जिल्हाधिकारी हेमंत हारकर, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, महिला व बालविकास अधिकारी हेमंत भदाणे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस व आशा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---