---Advertisement---
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकाने घराजवळील मलनिस्सारणची सेफ्टिक टाकी फुल्ल झाली आहे. त्यांनी नियमानुसार मनपाच्या आरोग्य विभागात ८०० रुपये भरून पावती घेतली आहे. पावती घेऊन पाच महिने उलटूनही मनपाच्या आरोग्य विभागाने ही टाकी खाली केली नसून यातून मनपा झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पिंप्राळा हुडको परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून डेंग्यू, मलेरिया या सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत मनपा प्रशासनाने त्वरीत सेफ्टिक टाकी खाली करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जैनोउदीन शेख सलीम मिस्त्री यांनी केली आहे.
पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी अशपाक इब्राहिम पिंजारी यांच्या घराजवळील मलस्सारणची टाकी फुल्ल झाल्याने त्यांनी मनपा प्रशासनाला दिनांक १० फेब्रुवारी २०२५ रोजी अर्ज करून रीतसर ८०० रुपये भरून ९५८५ क्रमांकाची पावती घेतली. याबाबत वारंवार महानगरपालिकेकडे चकरा मारून सुद्धा याकडे मनपाच्या प्रशासनाने कानाडोळा केले आहे. आज येतो उद्या येतो असे करत करत ५ महिने उलटले पण मनपाच्या आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे दिसून येत आहे.
टाकी फुल्ल झाल्याने परिसरात दुर्गंधी
मलनिस्सारणची टाकी फुल्ल झाल्याने उग्र वास व दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. लहान मुले मुली तसेच वयोवृद्ध आजारी पडत आहे याबाबत त्वरित टाकी खाली करण्यात यावी अशी मागणी हुडको चे सामाजिक कार्यकर्ते जैनोउदीन शेख सलीम मिस्त्री यांनी केली आहे.