सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोप पत्रातून समोर आलेल्या फोटोज नंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी आरोपींनी काढलेले 15 व्हिडिओ आणि 8 फोटो देखील आहेत.
हे सगळे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. केज शहरात आज तरुणांनी आक्रमक होत बाजारपेठ बंद केली आहे. काही संतप्त समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून निषेध नोंदविला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करत त्यांना या प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी करण्यात आली.
त्याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाल्मीक कराडच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. या वेळी कराडच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले, त्यानंतर त्याला फाशी देण्यात आली आणि अखेरीस पुतळ्याचे दहन करण्यात आले.
या आंदोलनाच्या वेळी ‘फाशी द्या, फाशी द्या! वाल्मीक कराड फाशी द्या!’ अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे तसेच अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.