जळगाव : शिरसोली प्र. बो. येथील सरपंच उषा अर्जुन पवार यांच्या सरपंच पदाच्या निवडीविषयी आक्षेप घेणारी याचिका जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी, ३० डिसेंबर रोजी निकाली काढली आहे. याचिकेतील आरोप, उषा पवार यांनी जात वैधता प्रमाणपत्र बनावट सादर केल्याचे होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी उषा पवार यांना अपात्र घोषित केले आहे.
ग्रामपंचायत सदस्य नितीन अर्जुन बुंधे यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामध्ये सरपंच निवड प्रक्रियेत नियमांचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला. विशेषतः, जात वैधता प्रमाणपत्राची अधिकाऱ्यांनी योग्य तपासणी केली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
तक्रारीनुसार, उषा पवार यांचा जात वैधता प्रमाणपत्र खोटे होते, आणि या प्रमाणपत्राच्या आधारेच त्यांनी सरपंच म्हणून निवड झाली होती. यावरून, तक्रारदार नितीन बुंधे यांनी या सरपंच निवड प्रक्रियेस फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरवण्याची मागणी केली होती.
दुसऱ्या बाजूने, जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी या प्रकरणावर विचार केला आणि त्यांच्या निष्कर्षात सांगितले की, सरपंच निवडताना नियमांचा भंग झाला नाही. मात्र, जात वैधता प्रमाणपत्र सरकारी कार्यालयाकडून निर्गमित केलेले नसल्यामुळे ते अवैध ठरवले गेले आहे, आणि याच कारणामुळे उषा पवार यांना सरपंच पदावर अनर्ह ठरवण्यात आले आहे. दरम्यान, या निकालानंतर शिरसोली गावात चर्चेला एकच उधाण आले आहे.