Shiv Sena News जळगाव : शहरातील नागेश्वर कॉलनी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 4 वर्षीय बालकाचा बळी घेतला. यामुळे शहरात संतापाची लाट आहे. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा हा बळी ठरल्याचे म्हणत शिवसेना शिंदे गटाकडून आज मंगळवार ३ जून रोजी तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले. प्रसंगी पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले होते.
चार वर्षीय बालकाचा मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. याबाबत मनपाच्या भोंगळ कारभारावर राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. अशात शिवसेना शिंदे गटातर्फे आज मनपात आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी या घटनेला जबादार कोण ? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी संतोष पाटील यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे केली. यावेळी संतोष पाटील यांनी आयुक्तांसह प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा असा टोला लगावला. यावर कायद्याच्या तरतुदीनुसार कुत्र्यांना ठार मारता येत नसल्याचे आयुक्त म्हणले असता, आम्ही तुम्हाला कुत्र्यांना मारा असे कधी म्हणालो असा सतंप्त सवाल संतोष पाटील यांनी उपस्थित केला. दरम्यान, संतोष पाटील यांनी अतिक्रमण, शहर स्वच्छता आदी विषयांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रशासनातील अधिकारी अतिक्रमणधारकांकडून हप्ते घेत आहेत त्यामुळे समस्या कायम आहे असा आरोप हि त्यांनी यावेळी केला. दरम्यान, आयुक्तांना निवेदन देखील सादर करण्यात आले. निवेदनात मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी सरिता माळी कोल्हे, शोभा चौधरी, भारती रंधे, ज्योती शिवदे, डॉ. सुषमा चौधरी, दीपमाला सुरवाडे, संतोष पाटील, ऍड. दिलीप पोकळे, सचिन सोनार, राहुल संगीले, सागर हिरवाळे, सचिन शिवदे, चेतन सनकत आदी उपस्थित होते.
