---Advertisement---
जळगाव : काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्यानंतर काँग्रेसच्या आणखी एका पदाधिकऱ्याने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अर्थात रावेर लोकसभा जळगाव जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र एस.टी वर्क्स काँग्रेस (इंटक)चे विभागीय अध्यक्ष भगतसिंग पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्याकडे राजीनामापत्र सोपविले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे रावेर लोकसभा जळगाव जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, शिंदे यांच्यानंतर पाटील यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले की काय ? असा प्रश्न उपस्थितीत होत असून आगामी विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
जिल्हाध्यक्षांवर केले गंभीर आरोप
भगतसिंग पाटील विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र एसटी वर्क्स काँग्रेस इंटक जळगाव जिल्हा या पदावर २०११ पासून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील १२ डेपो व जिल्हा कार्यशाळेत जवळपास १५०० कामगार इंटक संघटनेत सदस्य आहेत. काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी त्यांना कुठल्याही जिल्हा काँग्रेस बैठकीस आज पर्यंत न बोलवता इंटक संघटनेला काहीही महत्व दिले नाही. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांचे कार्यपद्धतीला व निष्क्रियतेला कंटाळून त्यांनी राजीनामा देत असल्याचे आपल्या राजीनामा पात्रात स्पष्ट केले आहे.
भगतसिंग पाटील यांची भावनिक पोस्ट
काँग्रेसमधील माझ्या ४५ वर्षांच्या प्रवासाला अखेर मनाविरुद्ध पूर्णविराम देत आहे. आज माझ्यासाठी हा अत्यंत कठीण आणि भावनिक क्षण आहे, कारण मनावर दगड ठेवून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. गेली ४५ वर्षे मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. माझं राजकीय आयुष्य, माझं योगदान आणि माझी निष्ठा हे सर्व या पक्षासाठी संपूर्णपणे समर्पित राहिले आहे. परंतु गेल्या काही काळापासून स्थानिक व जिल्हास्तरीय नेत्यांमधील अंतर्गत गटबाजी, कुरबुरी, भेदभाव आणि अपमानास्पद वातावरणामुळे पक्षात काम करणं कठीण झालं आहे. एकजूट, सन्मान आणि विचारांना स्थान असलेलं वातावरण हळूहळू हरवत चाललं आहे, आणि अशा परिस्थितीत काम करणं शक्य नसून अत्ता पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. मी कधीही कोणत्याही अपेक्षेने नव्हे तर निष्ठा आणि कर्तव्यभावनेने पक्षासाठी काम केलं. पण जेव्हा तुमचा अनुभव, तुमचं कार्य आणि तुमचा आवाज वारंवार दुर्लक्षित होतो, तेव्हा अशा परिस्थितीत पक्षात राहून कार्य करणे शक्य होत नाही. म्हणूनच आज मी अत्यंत भावनिक पण ठाम निर्णय घेत, माझा ४५ वर्षांचा काँग्रेसमधील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय इतका सहज किंवा सोपा नव्हता, परंतु पक्षातील काही नेत्यांनी निर्माण केलेल्या सध्याच्या परिस्थितीमुळे मला हे पाऊल उचलण्यास भाग पाडले आहे. माझं पक्षावर व राष्ट्रीय नेतृत्वावर विश्वास तथा प्रेम होतं, आहे आणि सदैव राहील. आपण सर्वांनी आजवर दिलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा यासाठी मनःपूर्वक धन्यवाद.
पुढचा प्रवास — नवीन पक्ष, नवीन दिशा, पण जुन्याच मूल्यांसह — सुरू राहील !