---Advertisement---
साक्री तालुक्यातील बसरावळ येथील गट क्र.५०/२ या सातबाऱ्याला मूळमालकाच्या नावातील नामसाधर्मचा फायदा घेऊन बँक व महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मूळ मालकास न्याय मिळावा या मागणीसाठी पिंपळनेर अपर तहसील प्रशासनाला व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा,कुडाशी येथे निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी यांच्याकडून कोणतेही पिक कर्ज घेतलेले नाही व सदर बोजा अनुसूची वरती माझी कुठलीही स्वाक्षरी अथवा अंगठा दिलेला नाही. अशी माहिती विजय वेच्या कुवर यांनी दिली आहे.सदर बोजा अनुसूची वरती चुकीची सही व अंगठा असून सदर बोजा घेणारा व्यक्ती मी नसून माझ्या नावाच्या नामसाधर्मचा फायदा घेऊन बँक व महसूल विभागाची फसवणूक केल्याचे तसेच दुय्यम निबंधक साक्री , ग्राममहसूल अधिकारी बसरावळ, मंडळ अधिकारी उमरपाटा या सर्वांची दिशा भूल करून सदर सातबारावरती बोजा चढविल्याने मला आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास होऊन कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. सदर सातबाराचा बोजा कमी करून सातबारा कोरा करावा. तसेच बोजा दाखल करणारे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध आपल्या स्तरावरून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर प्रेमचंद सोनवणे,कैलास देसाई,दीपक देसाई, लालसिंग देसाई, सोमनाथ चौधरी, फिलिप मावची, रवींद्र महाले,योगेश चौरे अशोक कुवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पीडित शेतकऱ्याचे बँकेत खातेही नाही:-
विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या नाव सातबारावर बोजा चढवण्यात आला आहे त्या शेतकऱ्याचे संबंधित युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुडाशी येथे अथवा इतरत्र सदर बँकेचे खातेही नाही हे विशेष. तर ज्या कागदपत्रांच्या आधारावर हे कर्ज मंजूर करण्यात आले आहे त्यावर स्वाक्षऱ्या देखील बनावट असल्याचे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणा- कोणाचा हस्तक्षेप आहे हे चौकशी दरम्यान स्पष्ट होऊ शकेल.याशिवाय सदर शाखेच्या माध्यमातून अजून इतर कोणाची फसवणूक झाली आहे का याबाबत बँकेने तपासणी केल्यास इतर प्रकरणं उघडकीस येऊ शकतात.
असे समजले प्रकरण:-
पीडित शेतकऱ्याचे पिंपळनेर येथील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे त्यामुळे सदर शेतकरी कर्ज काढण्यासाठी गेले असता तेथील बँक प्रशासनाने त्यांना आधीच आपणावर कर्ज असल्याचे सांगितले त्यानंतर सदर शेतकऱ्याला हा गंभीर प्रकार समजल्याने हे प्रकरण उघडकीस आले.आता संबंधित शेतकरी न्यायासाठी भरकटत असून सातबारा कोरा करून न्याय मिळावा अशी अपेक्षा करीत आहे.
नाव सारखे असल्याचा घेतला फायदा:-
बँकेतील सर्व व्यवहार पारदर्शक असतात असे असतांना बँकेत सादर केलेली कागदपत्रे पूर्णपणे योग्य व अचूक असणे आवश्यक असते केवळ नावातील सारखेपणा असल्याचा फायदा घेण्याचा प्रकार येथे झाला आहे.कर्जासाठी दाखल कागदपत्रे बनावट असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे बनवून देण्यासह ते मंजूर करण्यापर्यंत कोणाचा सहभाग होता याची चौकशी होणे गरजेचे आहे.
“सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला न्याय देऊन प्रकरण निकाली काढले जाईल व दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल”
श्री.जुबेर सैय्यद, शाखाधिकारी, युनियन बँक शाखा कुडाशी यांनी सांगितलं आहे.









