---Advertisement---
जळगाव : एसटी महामंडळ जळगाव विभागातील लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याबाबत व 156 सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्यायबाबतच्या तक्रारीबाबत मोठा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांचा पदभार धुळे येथील विभाग नियंत्रक विजय गीते यांना देण्यात आला आहे. लिपिक टंकलेखक भरती घोटाळ्याप्रकरणी विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी तथा काम गार सेनेचे प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे 25 फेब्रुवारी 2025 रोजी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल मुंबई येथे पाठविला होता.
सुरक्षा खात्याने पाठवलेल्या अहवालात पीडित कर्मचारी, आस्थापना शाखेचे लिपिक व अधिकाऱ्यांचे जबाब सामील करण्यात आले होते. चौकशी सुरू असताना पीडित महिला वाहकावर दबाव तंत्राचा वापर केल्याप्रकरणी तक्रार झालेली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सुरक्षा व दक्षता खात्याच्या आदेशाने विभागीय कार्यालयातील लिपिक प्रीतम पाटील यांची यापूर्वीच जामनेर येथे बदली करण्यात आली.
---Advertisement---
ज्या जलद गतीने एसटीच्या चालक वाहकांवर कारवाई केली जाते त्या गतीने या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करून आमरण उपोषणाचा इशारा भ्रष्टाचार निवारण समितीचे अध्यक्ष सुरेश चांगरे व सचिव दिलीप सूर्यवंशी यांनी दिला होता. सुरक्षा व दक्षता खात्याच्या चौकशीनंतर जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना दोषी धरण्यात आले असून त्यांना या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणी आरोपपत्र (चार्जशीट) दिले गेले आहे.
या संदर्भात भ्रष्टाचार निवारण समितीने जळगाव बस स्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केलेत. याप्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बालानी व भाजप मंडळ शक्ती महाजन यांचा भ्रष्टाचार निवारण समितीमार्फत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बस स्थानकावर पेढे वाटप करण्यात आले.
विभाग नियंत्रक भगवान शंकर जगनोर यांना कार्यमुक्त केल्याचे पत्र दिनांक 9 जुलै 2025 रोजी व्यवस्थापकीय संचालक यांनी काढले आहे. व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्या आदेशाचे पत्र जळगाव विभागाला प्राप्त झाले आहे.
दरम्यान, या संदर्भांत विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.