---Advertisement---
मैत्री करण्याच्या इराद्याने मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर वीस वर्षीय तरुणीला वारंवार फोन करुन संशयित तरुणाने तरुणीचा छुपा पाठलाग केला. प्रकार लक्षात येताच तरुणीने माझं लग्न ठरलं असून लवकरच लग्न होणार नाही, अशी समज दिली. त्यानंतर तिचा रस्ता अडवून तिला जबरीने रिक्षात बसवून पीडितेला बिग बाजारात घेऊन गेला. या मैत्रीच्या इराद्यात लव्ह जिहादची किनार असल्याची भीती व्यक्त केली गेली. या प्रकाराने गर्भगळीत झालेल्या तरुणीने शहर पोलीस ठाण्यात कैफियत मांडली. घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत अटक केली.
पीडितेचा घेतला मोबाइल
वीस वर्षीय तरुणी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह वास्तव्यास आहे. पीडिता महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ३० जून २०२५ रोजी पीडिता व तिचे नातेवाईक फिरण्यासाठी लांडोरखोरी उद्यानात रिक्षाने गेले होते. रिक्षा चालक सलमान निजाम (वय २४, रा. गेंदालाल मिल) या तरुणाने तेव्हा पीडित तरुणीचा मोबाइल क्रमांक घेतला होता. त्यानंतर संशयित तरुणाने वारंवार पीडितेच्या मोबाइल क्रमांकावर फोन केला. ती कोठे जातेय, ही माहिती मिळाल्यानंतर तो पीडितेचा छुपा पाठलाग करु लागला.
तुम मुझे बहोत पसंद हो !
संशयित तरुण पीडितेला दिवसेंदिवस त्रास देऊ लागला. मोबाइलवर संपर्क करुन त्याने पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असा शब्दप्रयोग केला. तो म्हणाला, “तुम मुझे बहोत पसंद हो!” त्यावेळी पीडितेने त्याला फटकारत सांगितले, “माझे लग्न ठरलेले आहे, माझे लग्न होणार आहे.” पीडितेने विवाहाची जाणीव करुन दिल्यानंतरही संशयित तरुणाने तिच्या सोबत मैत्री करण्यासाठी फोन केला. फोनवरुन तिला मानसिक त्रास देऊ लागला. १७ जुलैपर्यंत हा त्रास पीडितेने सहन केला.
पीडितेवर केली जबरी
गुरुवारी (१७ जुलै) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पीडिता न्यायालय चौकाकडून रस्त्याने बिग बाजार परिसर खान्देश मिलकडून जात होती. त्यावेळी संशयित तरुण रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू १६५२) घेऊन त्याठिकाणी आला. रस्ता अडवून पीडितेला त्याने थांबविले. पीडितेला त्याच्या रिक्षामध्ये बसण्यास भाग पाडले. तिला बिग बाजार परिसरात जबरीने घेऊन गेला. मागील सीटवर बसलेल्या पीडितेच्या शेजारी बसण्यासाठी जबरदस्ती केली.
पीडितेच्या या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात संशयित तरुणावर विनयभंग केल्याचा गुन्हा १७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी जावून प्रकार जाणून घेतला. पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर गुन्ह्याचा तपास करीत आहेत.