---Advertisement---
जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथील झिपरू अण्णा महाराज मंदिरासमोरील स्मशानभूमीमध्ये सोलर पॅनल बसविण्यात येत आहे. हे काम त्वरित थांबविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी याना देण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा आहे की, मागील २५ वर्षांपासून स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यात वॉल कंपाऊंडचे बांधकाम, तसेच नारायण धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे १०० हून अधिक वृक्षांचे रोपण आणि त्यांची देखरेख केली जात आहे.
परंतु, कोणतीही पूर्वसूचना किंवा ग्रामस्थांशी चर्चा न करता या ठिकाणी सोलर पॅनल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असतांना ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक हटवले तसेच मोठ्या झाडांची तोडही केली. ठेकेदाराने केलेल्या कृतीने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
सोलर प्रकल्प जनहितार्थ असला तरी तो सामूहिक सल्ला, पर्यावरणाचा विचार आणि योग्य जागेची निवड या निकषांवर आधारित असावा. स्मशानभूमीऐवजी इतर पर्यायी जागा नगर परिषदेकडे उपलब्ध आहेत, असेही नागरिकांचे म्हणने आहे. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपसरपंच कीर्तीकांत चौबे, अरुण भोई, सुकलाल कोळी, विजय वर्मा, शालिक कोळी, दीपक जंगम आदी उपस्थित होते. प्रशासनाने जनभावनेचा सन्मान करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.