जळगाव : शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मोकाट कुत्र्याने लचके तोडल्याने एका चार वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना नुकताच घडली आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंप्राळा परिसरातील सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर हा प्रश्न गंभीर झाला आहे. सोनी नगर ते सावखेडा रस्त्यावर विद्युत खांब आहे पण पथदिवेच नसल्याने रात्री अपरात्री नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावा लागत आहे. या अंधाराचा फायदा घेत मोकाट कुत्रे अंगावर धावून येत असल्याने नागरिक दहशीतीखाली आहेत.

पांडुरंग साई नगर जवळील रस्त्यावर मासे विक्री केली जाते. यातील काही विक्रते उरलेले किंवा खराब झालेले मासे आणि त्याचे अवशेष सर्रासपणे रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत उघड्यावर टाकून देतात. यामुळे अस्वच्छता तर वाढतेच पण परिसरात कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढतो. हे कुत्रे रस्त्यावर टाकलेले मासे खाऊन हिंसक होत आहे. महिला, वृद्ध पायदळ जाताना रस्त्यावर अंधार असल्याने कुत्रे अंगावर धावून येत असल्याचे घटना घडत आहे.
पिंप्राळा परिसरातील नवीन वस्ती वाढली असून दिवस रात्र वर्दळीचा रस्ता असून गणपती नगर, सोनी नगर, सुख अमृत नगर, बाबुराव नगर, ओमकार पार्क, विजय नगर, श्री राम नगरकडे जात असताना विद्युत खांब आहे पण पथदिवेच नसल्याने रात्री उशिरा अंधारातून नागरिकांना पायदळ प्रवास करावा लागत असतो. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत आहे. नागरिक कर भरतात पण मनपा प्रशासनाने पथदिव्याची सुविधा अद्याप दिली नाही. मनपा प्रशासनाकडून यावर ठोस उपाय योजना करून त्वरित पथदिवे लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.