---Advertisement---
मुंबई : अमेरिका–इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका मांडत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
वैद्यकीय परिषदेनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, देशात सध्या कोणतीही इंधन टंचाई नाही. भारताकडे सुमारे एका महिन्याचा पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून पेट्रोल-डिझेलचा साठा करून ठेवण्याची गरज नाही. पेट्रोल पंपांवर दिसणाऱ्या रांगांबाबत त्यांनी स्पष्ट केले की, या रांगा अफवांमुळे निर्माण झालेल्या घबराटीचे परिणाम आहेत.
ते पुढे म्हणाले की, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी केल्यास पुरवठा आणि मागणी यामध्ये ताण निर्माण होऊन कृत्रिम टंचाई उद्भवू शकते. त्यामुळे सर्वांनी नेहमीप्रमाणेच इंधन भरावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटी दहा रुपयांनी कमी केल्याने वाढत्या कच्च्या तेलाच्या दरांचा अतिरिक्त भार नागरिकांवर पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवांवरही मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला. अशा सर्व अफवा खोट्या असून सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा कठोर इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांनी अफवांना बळी न पडता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.









