---Advertisement---
मुंब्र्यातील राजकारणात आज एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला असून, वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या AIMIM नगरसेविका सहर शेख यांनी अखेर पोलीस स्टेशनमध्ये हजर होत लेखी माफी मागितली आहे.
मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावत चौकशीसाठी पाचारण केलं होतं. दोन वेळा चौकशी झाल्यानंतर अखेर सहर शेख यांनी लेखी स्वरूपात माफीनामा सादर केला.
काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत बोलताना सहर शेख यांनी, “पुढील पाच वर्षांत मुंब्र्यातील प्रत्येक उमेदवार AIMIM चाच असेल आणि संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवून टाकू,” असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून राजकीय वाद पेटला होता.
भाजपकडून या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आणि समाजात भीती निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर किरीट सोमय्या यांनी थेट पोलीस स्टेशन गाठत कडक कारवाईची मागणी केली होती.
या सगळ्या घडामोडीनंतर सहर शेख यांनी पोलिसांसमोर आपली बाजू मांडत “माझ्या वक्तव्यामागे कोणालाही दुखावण्याचा किंवा चिथावणी देण्याचा हेतू नव्हता. जर माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते,” असे लेखी माफीनाम्यात नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया सुरूच असून, सहर शेख यांच्या माफीनाम्यानंतर पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









