जळगाव : पाइप चोरी तसेच जलशुद्धीकरणातील भंगार साहित्य विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यातील चार संशयितांशी माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांनी मोबाइलवरून संपर्क करून संभाषण केले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
पोलिसांनी तपासात पाचोरा येथील भंगार खरेदी-विक्री व्यावसायिकाकडून तीन लाख, तर अकोला येथील भंगार खरेदी-विक्री व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये हस्तगत केले. आतापावेतो आठ लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली. पोलिसांनी गुरुवार, १२ रोजी अक्षय अग्रवाल तसेच भावेश पाटील यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी तपासाधिकाऱ्यांनी रिमांडरिपोर्टमध्ये ही माहिती सादर केली.
सूत्रधार सुनील महाजन यांचे संशयित अक्षय अग्रवाल याच्याशी ७३६ वेळा, कुंदन पाटील याच्याशी ५४७ वेळा, सादीक खाटीक याच्याशी १४१ वेळा, तर निरंजन पाटील याच्याशी १,०५७ वेळा मोबाइलवरून संभाषण झाल्याची माहिती तपासातून समोर आली. त्यामुळे सूत्रधार सुनील महाजन यांनी एकूण २,४८१ वेळा या संशयितांशी संपर्क साधून संभाषण केले, असे तपासाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
अकोला येथील गोवर्धन रामराव आखरे (वय ५७) या भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडून दोन लाख तर पाचोरा संभाजीनगर येथील भंगार व्यावसायिक जाकीर शेख अलाउद्दीन शेख (वय ४५) यांच्याकडून तीन लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले. या दोघा व्यावसायिकांना संशयितांनी चोरीचा मुद्देमाल विक्री केल्याचे त्यामुळे उघड झाले. आज न्या. एम. एम. बडे यांच्या न्यायालयाने अक्षय अग्रवाल तसेच भावेश पाटील यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.