सुरतचा कापड उद्योग अडचणीत; गॅस टंचाईमुळे कामगारांचा ओघ गावाकडे

---Advertisement---

 

गुजरातमधील सूरत येथील वस्त्रोद्योग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या वाढत्या टंचाईमुळे आणि दरवाढीमुळे स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणावर गावाकडे परतू लागले आहेत. त्यामुळे टेक्स्टाईल उद्योगासमोर मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


कोरोना काळात लॉकडाऊनमुळे जसा कामगारांचा पलायनाचा फटका बसला होता, तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. सध्या आंतरराष्ट्रीय तणाव, विशेषतः इराण-इस्रायल संघर्ष याचा अप्रत्यक्ष परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे मानले जात आहे.


सूरतमधील अनेक कामगार भाड्याच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांचा खर्च प्रचंड वाढला आहे. काही ठिकाणी छोट्या सिलिंडरच्या रिफिलिंगचे दर ५०० रुपयांवरून थेट २५०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे कामगार सांगत आहेत. त्यामुळे अनेकांना हा खर्च परवडत नसून त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.


रेल्वे स्थानकांवर सध्या कामगारांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा येथील कामगार पुन्हा आपल्या गावी परतत आहेत. डायिंग आणि प्रिंटिंग मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कामगारांनीही यामुळे काम सोडले आहे.
कामगारांच्या या पलायनाचा थेट परिणाम उद्योगावर होत असून, अनेक कारखाने आठवड्यातून एक-दोन दिवस बंद ठेवावे लागत आहेत. उत्पादनावर परिणाम होत असल्याने व्यापाऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे.


दरम्यान, परिस्थिती हाताळण्यासाठी काही उद्योग संघटनांनी पुढाकार घेतला आहे. पांदेसरा भागात सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करण्यात आले असून, येथे कामगारांना ४० ते ४५ रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले जाते. दररोज सुमारे पाच हजार लोकांसाठी अन्न तयार केले जात आहे, ज्यामुळे कामगारांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
नवरात्र आणि लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना कारखाने सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान उद्योगासमोर उभे राहिले आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली, तर सूरतचा कापड उद्योग मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---