---Advertisement---
जळगाव महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यपदांवर कोणाची वर्णी लागणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असतानाच आज मोठी घडामोड समोर आली आहे. सात पैकी पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले असून, उर्वरित दोन जागांवर मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी विविध पक्षांकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे सादर करण्यात आली होती. एकूण सात जागांसाठी तब्बल नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे सुरुवातीपासूनच ही निवड प्रक्रिया चुरशीची ठरणार हे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे भाजपकडून चार जागांसाठी पाच नावे देण्यात आल्याने एका नावावर टांगती तलवार होती. तर शिवसेनेकडून दोन नावे सादर करण्यात आली होती.
आज महापालिकेत महापौर दीपमाला काळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि गटनेत्यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत भाजपचे डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे आणि रमेश मताणी यांना हिरवा कंदील मिळाला आहे. तर शिवसेनेचे हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांचाही मार्ग मोकळा झाल्याचे समोर आले आहे. मात्र, अजूनही दोन जागांवर अंतिम निर्णय झालेला नाही. काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना दुरुस्तीसाठी २ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना-उबाठा गटाच्या गटनेतेपदाचा वाद विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याने त्या गटाचा प्रस्तावही सध्या होल्डवर ठेवण्यात आला आहे. यामुळे उर्वरित दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला धक्का बसणार, याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांत होणार आहे.
एकूणच, जळगाव मनपातील या घडामोडींनी राजकीय वातावरण तापले असून, अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









