---Advertisement---
तळोदा शहरातील शहादा रोडवर भन्साली प्लाझा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला आणि अवैध मद्य वाहतूक उघडकीस आली आहे. पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपमधून हा माल नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत वाहनासह एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ७ लाख ५८ हजार ५९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१८ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना संशयास्पद वाहतुकीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार शहादा रोडवर नाकाबंदी करण्यात आली. तपासणीदरम्यान (एमएच-४६-एआर-२३१०) क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअपमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्यसाठा तसेच शासनाने बंदी घातलेला विमल पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले.
जप्त केलेल्या मालामध्ये टँगो पंच देशी दारूचे ३ बॉक्स (किंमत १२,००० रुपये), कॅनॉन बिअरचे ४ बॉक्स (८,१६० रुपये) आणि किंगफिशर स्ट्राँग बिअरचे ४ बॉक्स (९,३६० रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय ७९,०७२ रुपयांचा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थही हस्तगत करण्यात आले. या सर्व मालाची एकूण किंमत १,०८,५९२ रुपये असून, वाहनाची किंमत ६,५०,००० रुपये आहे.
या प्रकरणात नटवर दामजी वसावे (वय २९, रा. काकरपाटी, ता. धडगाव, जि. नंदुरबार) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १२३, २२३, २७५ तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अकिलखा पठाण करत आहेत.









