---Advertisement---
TCS Nashik Case : येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील (टीसीएस) धर्मांतरण प्रकरणात कार्मिक व्यवस्थापक निदा खानचा अग्रिम जामीन येथील न्यायालयाने सोमवारी फेटाळला. निदा खानला अंतरिम दिलासा देण्यासही न्यायालयाने नकार दिला. निदा खानच्या वकिलाने युक्तिवाद करताना तिच्या वैद्यकीय स्थितीबाबत माहिती दिली. निदा खान गर्भवती आहे, असे त्याने न्यायालयात सांगितले.
सरकारी वकिलांनी निदा खानच्या वकिलाने सादर केलेल्या युक्तिवादाला विरोध केला. नाशिक रोड न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश के. जी. जोशी या प्रकरणी सुनावणी करीत आहेत. निदा खानचा अग्रीम जामीन फेटाळत त्यांनी या प्रकरणाची सुनावणी २७ एप्रिल रोजी ठेवली.
या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून तातडीने सत्यशोधन समिती स्थापन केली, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. याबाबत आम्ही घोषणा केली आहे. ही समिती मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये आहे. त्यांनी पोलिसांसोबत चर्चा केली. आता पीडिता, त्यांचे कुटुंब आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.
१० दिवसांत अहवाल सादर करण्यास आम्ही समितीला सांगितले. समिती सध्या चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचा मला विश्वास आहे. पोलिस तपासही सुरू आहे. आयोगाची एक समिती या तपासावर येत्या काही दिवसांत लक्ष ठेवेल, असे रहाटकर म्हणाल्या.
टीसीएसने केले निलंबित
निदा खानवर टीसीएसने अखेर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. कंपनीने गत ९ एप्रिल रोजीच तिच्यावर ही कारवाई केली. पण, ही माहिती सोमवारी समोर आली. निदा खान २७ डिसेंबर २०२१ पासून कंपनीशी संलग्न होती. ती प्रोसेस असोसिएट या पदावर कार्यरत होती. कंपनीने तिचा नेटवर्क ॲक्सेसही तत्काळ प्रभावाने रद्द केला आहे. याव्यतिरिक्त सध्या तिच्या ताब्यात असलेल्या कंपनीच्या सर्व मालमत्ता परत करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या. तिला कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहण्यास अथवा घरून काम करण्यासही मनाई करण्यात आली.









