‘सॉरी फॉर ऑल ऑफ यू’, म्हणत शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल, जळगावात हळहळ !

जळगाव : शहरातील एका शिक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना गुरूवार, २८  रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली असून  या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. राहुल अंबादास पाटील (वय ३५, रा.प्रवीण अकॅडमी, जळगाव) असे मयत शिक्षकाचे नाव आहे.

राहुल पाटील हे  राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या गुजराल पेट्रोल पंप मागील परिसरात असलेल्या प्रवीण अकॅडमी येथे मागील ९ वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यांना मागील काही दिवसांपासून पोटाचा आजार होता अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. राहुल पाटील यांनी गुरुवार, २८ रोजी दुपारी दोन ते तीन या वेळेत अकॅडमीत एक्स्ट्रा क्लास घेतला. त्यानंतर राहुल पाटील हे अकॅडमीच्या वर असलेल्या राहत्या घरी गेले. त्यांनी घरातच ३ वाजेच्या सुमारास ओढणीच्या साहह्याने छताला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.  ते आई-वडील, पत्नी, भाऊ, यांच्यासह राहत होते.

दरम्यान, याबाबत त्यांच्या परिवाराला समजले असता त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या साहाय्याने राहुल पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून राहुल पाटील यांना मयत घोषित केले. त्यासंदर्भात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

राहुल पाटील यांनी, पोटाच्या आजारामुळे ग्रस्त असल्यामुळे आत्महत्या करीत आहे. याला कोणालाही दोषी धरू नका अशा आशयाची चिट्ठी लिहिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

काय म्हटले आहे, सुसाईड नोट मध्ये ?
मी, राहुल पाटील असे लिहून देतो कि, माझ्या पोटाच्या विकारांमुळे तसेच सततच्या आजारपणामुळे हे पाऊल उचलत आहे. माझ्या या गोष्टीला कोणीही जबाबदार नसेल. सॉरी फॉर ऑल ऑफ यू… माझ्या आत्महत्येमागे प्रवीण अकॅडमीचा कुठेही संबंध नाही. त्यामुळे त्यांची बदनामी कोणीही करू नये हि विनंती.