---Advertisement---
Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आलेल्या थंडीच्या लाटेनंतर गेल्या आठवडाभरापासून हवामानाने अचानक यू-टर्न घेतला होता. १९ नोव्हेंबरपर्यंत रात्रीचे तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. मात्र, २० नोव्हेंबरपासून अचानक रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाली, ज्यामुळे भर हिवाळ्यात काही प्रमाणात उकाडा जाणवत होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रात्रीचे तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते; परंतु आता हवामान विभागाने जिल्ह्यासाठी एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आगामी तीन ते चार दिवसांत रात्रीच्या तापमानात हळूहळू घट होणार आहे. १ डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीचे जोरदार आगमन होण्याचा अंदाज अलीकडेच हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून जळगावकरांना पुन्हा एकदा स्वेटर आणि शाली बाहेर काढण्याची, थंडीला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.
हवामान विभागाने यंदाचा हिवाळा जोरदार राहण्याचा अंदाज आधीच वर्तविला होता. त्यानुसार, नोव्हेंबरप्रमाणेच डिसेंबर महिन्यातही एक ते दोन वेळा थंडीच्या लाटा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यातून थंडी गायब होण्याची कोणती कारणे
गेल्या आठवडाभरापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यामुळे काही अंशी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि उत्तरेकडील थंड वारे जळगावाकडे येण्यास रोखले गेले होते. यामुळे तापमानात वाढ झाली होती. आता ही परिस्थिती हळूहळू कमी होत असून, वातावरण कोरडे होत जाणार आहे. त्यामुळे उत्तरेकडील थंड वारे पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.









