सौर दिव्यांच्या चोरीमुळे इंदवेतील आश्रमशाळेच्या रस्त्यावर रात्रीचा अंधार

साक्री :  तालुक्यातील इंदवे आश्रमशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर सौर पथदिवे लावण्यात आले आहे. यातील दोन सौर पथदिवे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे सायकांळी या रस्त्याने ये-जा करतांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचा आश्रमशाळेतील विद्यार्थी वापर करत असतात. यासोबतच पहाटे व सायकांळी या रस्त्याने ग्रामस्थ फिरत असतात. त्यांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे.

गावातील बरेच सौर पथदिव्यांमधील बॅटरीची चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने गावातील बरेच पथदिवे हे बंद अवस्थेत आढळून येत आहेत.

सौरदिव्यांच्या बॅटरीसौर पॅनेल, सौरदिवे गायब होत आहेत.  सौरदिवे बंद  असल्यामुळे गावात चोरीचे प्रमाणही वाढू शकते अशी शंका ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे. पथदिवे खरेदी करण्यासाठी शासनाकडून लाखोंचा निधी येतो. गावात शाळा, दवाखाने,स्मशानभूमी, आदिवासी वस्त्यांमध्ये सौर दिवे उभारून प्रकाश योजनेची व्यवस्था केली आहे. सौर पथदिव्यांमुळे भारनियमन काळात मोलाची साथ दिली होती. भारनियमनमुक्त व रात्रीची वीज उपलब्ध झाल्याने सौरपथ दिव्यांकडे ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा चोरट्यांनी घेतला आहे.

गावातील सौरदिवे चोरटे कोण? याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. तसेच काही ठिकाणचे सौर पथदिवे सुस्थितीत असून देखभाल-दुरुस्ती झाल्यास प्रकाश देण्यास उपयुक्त ठरू शकतील, तरी सुस्थितीतील सौरदिवे दुरुस्त करून घ्यावेत. स्मशानभूमीकडील पथदिव्याचा कोसळलेला खांब दुरुस्त करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे