जळगाव : जिल्ह्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अमळनेर तालुक्यातील मंगरुळ एमआयडीसी परिसरात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील मारवड येथील रहिवासी व हल्ली अमळनेर शहरातील प्रताप मील परिसरात तुषार चिंधू चौधरी हा तरुण वास्तव्यास होता. तुषार हा ५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपासून बाहेर पडला होता. परंतु, त्या दिवसापासून तो घरी परतलाच नाही.
दरम्यान, ६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता तुषारचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील एमआयडीसी पारिसरात आढळून आला. या घटनेची माहिती अमळनेर पोलिसांना देण्यात आली. खबर मिळताच अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोउनि बागुल, पोहेकॉ कैलास शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला.
यावेळी पंचनाम्या दरम्यान, त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा आढळून आल्याने त्यांचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. त्याच्या मृतदेहाजवळच दारूच्या बाटल्या पडलेल्या मिळून आल्या. या घटनेबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.