जळगाव : गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात बस अपघाताच्या घटना वाढल्या असून, यात अनेकांना जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील नुकत्याच दोन घटना घडल्या, यात एका प्रवाशाला जीव गमवावा लागला तर, अनेक प्रवाशी जखमी झाले होते. अशातच सोमवारी मद्यधूंद चालक बस चालवीत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.दरम्यान, जळगाव विभाग नियंत्रकांनी चालकावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
जळगाव एसटी डेपोमध्ये एक गंभीर घटना घडली, ज्यात बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता. 16 डिसेंबर रोजी रात्री, जळगाव डेपोची बस क्रमांक (एम. एच. 14 बी टी 2304) बाभूळगाव मुक्कामी जात होती. पाळधीच्या पुलावर बस चालवताना प्रवाशांनी लक्षात घेतले की, चालक आनंद माळी मद्यधुंद आहे. प्रवाशांनी तत्काळ बस थांबवून कंडक्टरकडे याबद्दल तक्रार केली.
कंडक्टरने विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांना कळवले, त्यावर त्यांनी तातडीने खाजगी वाहनाने घटनास्थळी धाव घेतली. विभाग नियंत्रकांनी चालकाची चौकशी केली. त्यानंतर आनंद माळीच्या जागी दुसऱ्या चालकाची व्यवस्था करून बस मार्गस्थ करण्यात आली.
विभाग नियंत्रकांनी सांगितले की, चालक आनंद माळीच्या मेडिकल तपासणीमध्ये त्याला मद्य सेवन केल्याचे आढळले, त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येणार आहे.