जळगाव : मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ३ जानेवारीला दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. यात रोडवर पडलेल्या महिलेला भरधाव ट्रकने चिरडले होते. तर त्यांचा मुलगा कामील हा जखमी झाला होता, त्याचावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी (ता. ४) रोजी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, समतानगरनगरमधील रहिवासी अल्ताफ बेग यांच्या पत्नी जुबेदाबी मुलगा कामील बेग (वय २०) सावदा येथून साखरपुडा आटोपून दुचाकी (एमएच १९, डीएक्स ८१५८)वरून जळगावला येत असताना, नशिराबादजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी (एमपी ०९, एमझेड ७६३७) स्वाराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली.
या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले, तर कामीलची आई जुबेदाबी यांच्या अंगावरून सुसाट ट्रक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. गंभीर जखमी कामील बेग याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. तेथे उपचार सुरू असताना, बुधवारी सायंकाळी कामील बेग याची प्राणज्योत मालवली.
घटनेची माहिती मिळताच कुटुंब व नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री आठला कामील बेग याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला असून, सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांना सोपवला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.