---Advertisement---
वॉशिंग्टन : इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेच्या हवाई आणि लष्करी तळांचे अतोनात नुकसान झाले. याची दुरुस्ती करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च करावा लागणार असल्याचे अमेरिकेच्या एका लष्करी अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये पर्शियन आखातातील अमेरिकेच्या लष्करी तळांचे आणि शस्त्रास्त्रांचे पूर्वी सांगण्यात आले होते त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाले आहे. लष्करी तळांच्या दुरुस्तीसाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इराणने किमान सात देशांमधील महत्त्वाच्या लष्करी तळांना लक्ष्य केले, ज्यामध्ये स्टोरेज वेअरहाऊस, लष्करी कारवायांचे व्यवस्थापन जेथून चालते अशी कमांड सेंटर्स, एअरक्राफ्ट हँगर आणि सॅटेलाईट कम्युनिकेशनचा समावेश आहे. इतकेच नाही, तर इराणने हवाई पट्टी. रडार प्रणाली, लष्करी हालचाली आणि सव्हॅलन्ससाठी आवश्यक असलेली विमाने नष्ट केली. अमेरिकेचे संरक्षण विभाग आणि यूएस सेंट्रल कमांडनेही नुकसानीसंदर्भात माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने नुकसानीची माहिती सार्वजनिक केल्याने अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अडचणी वाढल्या आहेत.
२०० अब्ज डॉलर्स निधीची मागणी
रिपब्लिकन पक्षामधील काही खासदारांनी सरकारच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका खासदाराने सांगितले की, आम्ही अनेक आठवड्यांपासून नुकसानीची माहिती मागत आहोत; मात्र ठोस माहिती दिली जात नाही. पेंटागॉन अमेरिकन कॉंग्रेसकडे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधीची मागणी करीत आहे. हा निधी कशासाठी हवा याचे कारण त्यांनी दिलेले नाही. संघर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अमेरिकेने लष्करी कारवायांवर ११ अब्ज डॉलर्सहून अधिक खर्च केला.









