---Advertisement---
नवी दिल्ली : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करून १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. यावर सोमवारी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान प्रशासकीय आणि तांत्रिक कारणास्तव ही मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून मिळावी, अशी विनंती आयोगाने केली आहे. या अर्जावर सोमवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर तातडीने सुनावणी होणार आहे.
दुसरीकडे, वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्यात निवडणुकीला तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात काही गावांचा समावेश करण्याची मागणी याचिकेत करण्यात आल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे, मात्र अद्याप अंतिम निकाल आलेला नाही. निकाल लागेपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळावी, अशी मागणी करीत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.









