धुळे: शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यात तब्बल २६ तोळे सोन्याची चोरी झाली होती. पोलिसांनी केवळ ९ दिवसांमध्ये मध्यप्रदेशातील जंगलातून २६ तोळे सोने आणि इतर वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या.
सोमवार २ डिसेंबर रोजी हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे विवाह सोहळ्यानिमित्त पूजन आणि संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिभा बोरसे यांच्या मुलीचा हा विवाह सोहळा होता. हा सोहळा रात्री ९.१५ वाजता होता. दरम्यान, या संगीत कार्यक्रमात त्यांच्या पर्समधून त्यांचे स्वतःचे व नवरीचे असे एकूण २६ तोळे सोन्याचे दागिने होते. यात सोन्याचा हार, बांगड्या , तीन साखळ्या, रोख रक्कम तसेच मोबाईल हँडसेट असा जवळपास १५ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवजाचा समावेश होता. विवाह सोहळ्यात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली. हा कार्यक्रम चालू असतांना एक लहान मुलगा आणि मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तींनी या किंमती वस्तू चोरल्याचा संशय व्यक्त करत प्रतिभा बोरसे यांनी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चोरीसंबंधीची माहिती मिळाल्यावर, मोहाडी नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याचा तपास लावण्याचे आदेश दिले. शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मध्य प्रदेशातील राजगढ जिल्ह्यात तपास सुरू केला. तपास करत असताना, पथकाला चौघे संशयित चोरी करणारे व्यक्ती हुलखेडी, गुलखेडी, राजगढ या ठिकाणी लपले असल्याची माहिती मिळाली. पथकाने नऊ दिवस राजगढ जिल्ह्यात तपास केला, आणि जंगलात असलेल्या झोपडीत चोरीचा मुद्देमाल मिळवला. पोलिसांनी झडती घेतल्यावर त्यांना २६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि इतर चोरीचे सामान आढळले.
या यशस्वी कारवाईसाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि धुळे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनावरून मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील यांच्यासह विशेष पथकाने ही कामगिरी पूर्ण केली.