---Advertisement---
जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात सर्व प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सत्ताधारी महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) जागावाटपावर एकमत होत नसल्याने भाजपविरोधी भूमिकेत परिवर्तित होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील ४८ तास जळगावच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर ५७ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली होती. याच यशाच्या जोरावर यंदाही भाजप जागावाटपात आक्रमक भूमिका घेत असल्याने मित्रपक्षांना अपेक्षित वाटा मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार ) यांना दुय्य्म वागणूक दिली जात असल्याचा आरोप अंतर्गत पातळीवरून पुढे येत आहे.
गोपनीय बैठका, महाआघाडीची हालचाल
गेल्या काही दिवसांपासून जळगावात सलग गोपनीय बैठका सुरु असून, या बठकींमध्ये भाजपला रोखण्यासाठी नवा राजकीय फॉर्म्युला ठरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका बैठकीसाठी मुंबईत राज्यस्तरीय नेत्यांची उपस्थिती होती. भाजपविरोधात शिंदेसेना, उद्धवसेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस आणि एमआयएम यांना एकत्र आणण्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
जागावाटपावरून मतभेद टोकाला
बुधवारी रात्री भाजप व शिंदेसेना यांची संयुक्त बैठक झाली. मात्र, या बैठकीसाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला दूर ठेवण्यात आल्याने नाराजी अधिकच वाढली. भाजपकडून ५५ जागा, १७ शिंदेसेना आणि राष्ट्रवादीसाठी केवळ ३ जागांचा प्रस्ताव मांडण्यात आल्याची चर्चा आहे. या प्रस्तावावर राष्ट्रवादीने तीव्र आक्षेप घेत २६ जागांची मागणी केल्याचे समजते.
दरम्यान, या घडामोडीनंतर उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात बैठक पार पडल्याचेही कळते. जागावाटपाच्या वागणुकीमुळे अस्वस्थ झालेल्या शिंदेसेनेसह सर्व पक्ष भाजपविरोधात एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय समीकरणे बदलणार…
आता पुढील ४८ तासांत कोणता पक्ष कोणत्या भूमिकेत उभा राहतो, अधिकृत आघाडी जाहीर होते का, की महायुतीत तडजोड होते, यावर जलगां महापालिकेची निवडणूक आणि संपूर्ण राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.









