---Advertisement---
भुसावळ : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या जळगाव व बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकऱ्यांना विशेष अनारक्षित मोफत रेल्वे गाडी आज भुसावळ रेल्वे स्थानकावरून भक्तिमय वातावरणात रवाना झाली.
या विशेष गाडीला केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हरी झेंडा दाखवून पंढरपूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. यावेळी रेल्वे भुसावळ विभागाच्या विभागीय व्यवस्थापक इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महायुती व भाजपा पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावर्षीच्या वारीसाठी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष गाडीची विनंती केली होती. त्यानुसार आज शनिवारी ( 5 जुलै ) रोजी दुपारी 1.30 वाजता भुसावळहून पंढरपूरकडे गाडी क्रमांक 01159 ने हजारो भाविक रवाना झालेत.
---Advertisement---

उल्लेखनीय बाब म्हणजे, या विशेष गाडीतील सर्व जनरल (अनारक्षित) तिकिटांची रक्कम स्वतः रक्षा खडसे यांनी स्वखर्चातून भरली असून ही संपूर्ण सेवा वारकऱ्यांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. गाडी 6 जुलै रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर स्थानकावर पोहोचेल व त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता परतीच्या प्रवासासाठी निघेल. ही गाडी 7 जुलै रोजी पुन्हा भुसावळला परत येणार आहे.
गाडी रवाना होण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या व विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेऊन परत आशीर्वाद घेऊन यावे, असे आवाहनही केले. भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाचा गजर, “माऊली माऊली” च्या जयघोषात ही गाडी प्रस्थान करताना वातावरण भारावले होते.या उपक्रमामुळे रावेर लोकसभा क्षेत्रातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून, या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.