भुसावळ / जळगाव : नवापूर चेक पोस्टवर बदली करण्याचा मोबदला म्हणून आपल्याच विभागाच्या निरीक्षकाकडून तीन लाखांची लाच खाजगी पंटराच्या माध्यमातून स्वीकारल्याप्रकरणी जळगावातील आरटीओ दीपक पाटील यांना छत्रपती संभाजी नगर एसीबीने ताब्यात घेतले होते तर खाजगी पंटर भिकन मुकुंद भावे (५२, रा. आदर्श नगर प्लॉट, नं. ९८, जळगाव) यास अटक करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री दीपक पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागताच त्यांना जिल्हा साम ान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून खाजगी पंटर भावे यास शुक्रवारी न्यायालयाने एका दिवसांची कोठडी सुनावली.
जळगावातील मोटार वाहन निरीक्षक यांची नोव्हेंबर महिन्यात नवापूर चेक पोस्टवर बदली करण्यात आल्यानंतर त्या मोबदल्यात जळगाव प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी भिकन भावे नावाच्या खाजगी पंटराच्या माध्यमातून ४ नोव्हेंबर रोजी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती मात्र अधिकाऱ्याची लाच द्यावयाची नसल्याने अधिकाऱ्याने छत्रपती संभाजीनगर विभागीय लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
नियुक्तीनंतर ५१ व्या दिवशी स्वीकारली लाच
तक्रारदाराकडून भावे यांनी मेहरुण तलावाजवळील लेक अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी लाच रक्कम स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व नंतर प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना त्यांच्या कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. दोघा आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक पाटील हे ५१ दिवसांपूर्वीच जळगावात रुजू झाले होते मात्र त्यांच्यावर झालेल्या लाचेच्या कारवाईने अधिकाऱ्यांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दीपक पाटील रुग्णालयात
एसीबी सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक पाटील यांना ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागताच त्यांना जळगाव सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले तर खाजगी पंटर भावे यास न्यायालयाने एका दिवसांची कोठडी सुनावली. तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहेत.