जळगाव : शहरातील खेडी शिवारात असलेल्या कावेरी हॉटेल जवळील विद्या नगरमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी, १७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
विद्या नगरमधील सोनी वाणी नामक महिलेचा कुत्रा परिसरात नेहमी भुंकत असतो आणि लहान मुलांना धक्का देण्याचा किंवा चावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. या कारणावरून तीन दिवसांपूर्वीही महिलेला समजावून सांगितले होते. मात्र, शुक्रवारी दुपारी कुत्रा पुन्हा लहान मुलांवर धावून आला, यावर स्थानिक नागरिकांनी महिलेला कुत्रा आवरण्याचे सांगितले. यामुळे रागावलेल्या महिलेनं आपल्या ओळखीच्या पाच ते सहा गुंडांना घटनास्थळी बोलावून घेतले.
त्यावेळी गल्लीत उभे असलेले चंद्रकांत जीवराम चौधरी (वय ४०), किशोर अर्जुन पाटील (वय ४२) आणि चेतन लक्ष्मण खडसे (वय ३५) यांना दगड, लाकडी दांडका आणि फरशीने मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तींनी महिलेसह इतरांवर देखील मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे. यावेळी परिसरातील काही लोकांच्या अंगावर देखील दगडफेक करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी झालेल्या तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.