जळगाव : सुसाट वेगावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवरून वीज खांबाला कारने धडक दिली. त्यानंतर पलटी होत कारने रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मालवाहू रिक्षाला ठोस मारत तिला पलटी केली. हे थरारनाट्य गुरुवार, ७ रोजी मध्यरात्रीनंतर सागर मैदानासमोर पेट्रोल पंपाजवळ घडले. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गुरुवारी रात्री एमएच ०३ एएच ८५३६ ही मालवाहू रिक्षा फेल होऊन बंद पडली. त्यामुळे चालकाने रस्त्याच्याकडेला बंद रिक्षा पार्किंग केली. दरम्यान मध्यरात्रीनंतर महाबळकडून आकाशवाणी चौकाकडे भरधाव कार जात होती. चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने कारने डिव्हायडरवरून वीज कंपनीच्या खांबाला धडक दिली. त्यानंतर कारने राँगसाईडला पलटी घेत रस्त्याच्याकडेला लावलेल्या नादुरुस्त रिक्षाला ठोस मारली. यामुळे ही मालवाहू रिक्षा उलटली. या विचित्र अपघातामध्ये रिक्षाच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज कंपनीचा खांब कारच्या धडकेत वाकून त्याचे नुकसान झाले. शुक्रवारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाकलेला खांब काढून नवीन खांब बसविला.
मालवाहू रिक्षाचालक प्रकाश राजपूत हे विविध हॉटेलमध्ये पापड सप्लाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या रिक्षाच्या मदतीने त्यांचा व्यवसाय सुरू होता. त्यांनी सांगितले की, रात्री रिक्षा फेल झाल्याने रस्त्याच्याकडेला ती थांबविली होती. सकाळी मेकॅनिकल आणून रिक्षा दुरुस्त करणार होतो. मात्र रात्री भरधाव कारने रिक्षाला ठोस दिल्याने कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच माझा कामधंदा बुडाला, अशी कैफियत मांडत अपघाताला कारणीभूत कार चालकाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी भावना रिक्षामालक चालक प्रकाश राजपूत यांनी व्यक्त केली.
डॉक्टरलाही कारने उडविले होते
काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर हॉटेल रॉयल पॅलेससमोर भरधाव कारने पायी चालणाऱ्या एका डॉक्टरला उडविले होते. या दुर्घटनेत डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला होता. रात्री कारच्या थराराने डॉक्टरच्या अपघाती मृत्यूच्या घटनेला अनेकांनी आज उजाळा दिला.