जळगाव । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचे परिणाम महाराष्ट्रात दिसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यात आज शुक्रवारी हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हयात आज शुक्रवारीपासून पुढील तीन दिवस अंशतः ढगाळ असणार आहे. यामुळे कमाल, किमान तापमानात चांगलीच वाढ झालेली दिसेल. मात्र, ९ डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढणार आहे.
या तारखेपासून किमान तापमान १२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात आली आहे. गुरुवारी शहरात कमाल तापमान ३३ तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.
आगामी तीन दिवस किमान तापमान १४ ते १६ तर कमाल तापमान ३२ ते ३४ दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ९ डिसेंबरपासून थंडी जोर धरायला सुरुवात करेल.
यानंतर कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी शहरात सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान आकाशात ढग गोळा झाले आहे. आकाशही अंधारून आले होते. मात्र, सहा वाजेनंतर पुन्हा आकाश निरभ्र झाल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले होते.
‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
रत्नागिरी – 5 डिसेंबर सिंधुदुर्ग – 5 आणि 6 डिसेंबर पुणे – 5 डिसेंबर कोल्हापूर – 5, 6, 7 डिसेंबर सातारा – 5 डिसेंबर लातूर – 5 डिसेंबर धाराशिव – 5 डिसेंबर