घराचं खोदकाम करताना ‘खळ्ळं-खळ्ळं’ आवाज; अन् मातीतून निघाला खजिना; चांदीची नाणी सापडली….!

---Advertisement---

 

घराच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या साध्या खोदकामातून अचानक खजिना सापडल्याची घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. कुदळीने माती उपसताना अचानक ‘खळ्ळं-खळ्ळं’ असा आवाज आला आणि मातीतून चांदीची नाणी बाहेर येऊ लागली. या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

ही घटना सांगवी पाटण (ता. आष्टी) येथे घडली. घराच्या बांधकामासाठी शशिकांत खुटाळे यांच्या जागेवर खोदकाम सुरू असताना मातीच्या ढिगाऱ्यात मुलांना काही चांदीची नाणी दिसली. सुरुवातीला कुतूहल म्हणून उचललेली नाणी पाहता-पाहता मोठ्या संख्येने सापडू लागली. गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महसूल प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून सुमारे २५० चांदीची नाणी जप्त करण्यात आली. या नाण्यांवर “One Rupee India 1941” असा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. ही नाणी शुद्ध चांदीची असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मात्र स्थानिक नागरिकांच्या मते, सापडलेल्या नाण्यांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते. काही नाणी गायब असल्याची चर्चा देखील गावात सुरू आहे. त्यामुळे नेमकी किती नाणी सापडली आणि काही नाणी इतरत्र गेली का, याचा तपास प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

महसूल प्रशासनाने जप्त केलेली नाणी तहसील कार्यालयात जमा केली असून पुढील तपासासाठी पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे चार ते पाच किलो वजनाचा नाण्यांचा साठा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी अजूनही मोठा खजिना दडलेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही नाणी नेमकी कुणी आणि कधी पुरून ठेवली? त्या काळातील कोणत्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी त्याचा संबंध आहे? तसेच गायब झालेल्या नाण्यांचा माग काढण्यात प्रशासनाला यश येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सांगवी पाटण परिसरात उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---