---Advertisement---
श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान दोन अमेरिकन नागरिकांकडे एक गार्मिन सॅटेलाइट फोन आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला त्यांची चौकशी केली आणि नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
ज्या व्यक्तीच्या सामानात हा फोन सापडला, त्याचे नाव जेफ्री स्कॉट असून तो अमेरिकेतील मोंटाना राज्याचा रहिवासी आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणीदरम्यान, दोन अमेरिकन नागरिकांचे सामान स्कॅन केले जात होते, तेव्हा त्यांच्या एका बॅगेत गार्मिन सॅटेलाइट फोन सापडला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ थांबवले आणि चौकशी केली. त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दोन अमेरिकन नागरिक श्रीनगरला कोणत्या उद्देशाने आले याची माहिती समोर आलेली नाही. यापूर्वीही भारतातील विविध विमानतळांवर अमेरिकन नागरिक सॅटेलाइट फोनसह पकडले गेले आहेत. परदेशी पर्यटक अनेकदा सॅटेलाइट फोनवरील बंदीबद्दल अनभिज्ञ राहून भारतात येतात.
सॅटेलाईट फोनबाबत काय नियम आहेत?
- थुराया किंवा इरिडियम सारखे सॅटेलाइट फोन भारतात आणण्यास सक्त मनाई आहे.
- एखादी व्यक्ती असा फोन सोबत आणत असेल तर त्यांना विमानतळावरील सीमाशुल्क विभागाला (कस्टम्स) कळवणे आवश्यक आहे.
- नवीन नियमांनुसार, दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत, परवानगीशिवाय सॅटेलाइट फोन किंवा सॅटेलाइट जीपीएस उपकरण बाळगणे गुन्हा आहे.
- भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ (कलम ६), भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ (कलम २०), आणि दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत, ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि २ कोटींपर्यंत दंड (किंवा दोन्ही) ठोठावला जाऊ शकतो.









