---Advertisement---
शहरातील अयोध्या नगरातील राका चौकात जुन्या वादाच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांना चौघांनी मिळून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मंगळवारी, १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून माहितीनुसार, ज्ञानेश रत्नाकर मोरे (वय ३८, रा. अयोध्या नगर, जळगाव) हा तरूण सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता अयोध्या नगरातील राका चौकात उभा होता. त्यावेळी सनी कोल्हे, गणेश हिरे, मिळालेल्या हितेश जोनवाल आणि दीपक महाजन (सर्व रा. अयोध्या नगर, जळगाव) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्ञानेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याला मारहाण केली.
ज्ञानेशला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचा भाऊ हितेश मोरे भांडण सोडवण्यासाठी तिथे आला. मात्र, त्यालाही लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली, ज्यामुळे तो जखमी झाला. ही घटना घडल्यानंतर हितेश मोरे याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून, सनी कोल्हे, गणेश हिरे, हितेश जोनवाल आणि दीपक महाजन या चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अयोध्या नगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे करत आहेत.