---Advertisement---
जळगाव : शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गवार नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. आज मंगळवारी (२४ जून ) रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्वामी नारायण मंदिराजवळ महामार्गांवर दोन ट्रकची जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा चालक हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक-OD-15-C-2963) आणि राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक RJ-14-GT-0421) यांच्यात समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही धडक इतकी तीव्र होती की, एक ट्रक चालक केबिनमध्ये अडकून गेला होता. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत अडकलेल्या चालकाला वाचविण्याचे शर्थचि प्रयत्न केले. केबिन दोरीच्या सहाय्याने ओढून त्याला बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता.
---Advertisement---
दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातस्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.
पोलीस अधिक तपास करीत असून ट्रकचालक कोणत्या दिशेने, कोणत्या वेगाल जात होते, हे शोधले जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार एका ट्रकने रस्ता ओलांडताना वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे ही धडक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.