अमळनेरमध्ये गोवंशाची निर्दयी वाहतूक करणारे दोन वाहने जप्त, चार जनावरांची सुटका, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

अमळनेर शहरात गोवंशाची बेकायदेशीर आणि निर्दयी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन वाहने जप्त केली. या कारवाईदरम्यान चार गोवंशांची सुटका करण्यात आली असून दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारास अमळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाला गोवंश वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सुभाष चौक आणि तेली भवन परिसरात सापळा रचण्यात आला.

तपासणीदरम्यान टाटा कंपनीची (MH-18-AA-4261) आणि महिंद्रा सुप्रो (GJ-26-T-7446) ही दोन वाहने संशयास्पद आढळली. वाहनांची पाहणी केली असता चार गोवंश अत्यंत दाटीवाटीने बांधून नेले जात असल्याचे दिसून आले. त्यांना चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचेही स्पष्ट झाले.

सदर जनावरांची अवैध वाहतूक किंवा कत्तलीसाठी नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ चारही गोवंशांची सुटका केली. या कारवाईत सुमारे ४८ हजार रुपये किमतीचे गोवंश आणि अंदाजे ४ लाख ६० हजार रुपये किमतीची वाहने असा एकूण ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अबरार जहूर शेख (२५, रा. शिरपूर, जि. धुळे) आणि सतिश कैलास थोरात (३५, रा. शिरपूर, जि. धुळे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---