अज्ञात वाहनाच्या धडकेत पहूर येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू

---Advertisement---

 

जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पहूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही दुर्घटना ३ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनासगाव फाटा (भवानी माता मंदिराजवळ) येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र उर्फ बाळू वसंत बडगुजर हे डेंटल इक्विपमेंट सेल्स अँड सर्व्हिसचा व्यवसाय करत होते. ते नेहमीप्रमाणे जळगाव येथे दिवसभराचे काम आटोपून आपल्या दुचाकीने (एमएच १९ ई क्यू ८३५४) पहूरकडे परतत होते. यावेळी मागून अतिवेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते रस्त्यावर काही अंतर फरफटत गेले. रात्रीची वेळ असल्याने त्वरित मदत न मिळाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, महामार्गावरून जाणाऱ्या पहूर येथील काही गॅरेज कामगारांनी अपघातस्थळी जाऊन दुचाकीच्या क्रमांकावरून त्यांच्या भावाशी, डॉ. रवींद्र बडगुजर यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पहूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---