---Advertisement---
शहादा तालुक्यातील करजई शिवारामध्ये अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, एकाच रात्री दहा शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंप आणि बोरींगच्या केबल वायरची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेती साहित्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शहादा तालुक्यातील करजई येथील रहिवासी आणि व्यावसायिक शेतकरी गणेश गोविंद पाटील (वय ४५) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. दिनांक २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी करजई शिवारातील शेतातून फिर्यादी गणेश पाटील यांच्या सोलर पंपाची १२ हजार रुपये किमतीची २४० फूट काळ्या रंगाची केबल वायर चोरून नेली.
फिर्यादी यांच्यासह परिसरातील इतर नऊ शेतकऱ्यांच्या शेतातील बोरींगच्या केबलवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामध्ये सचिन नरसई पाटील यांची ७५० रुपयांची केबल, देविदास जगन्नाथ पाटील यांची ५०० रुपयांची केबल, पुरुषोत्तम काशिनाथ पाटील यांची ५०० रुपयांची केबल, श्रीकृष्ण निमजी पाटील यांची १००० रुपयांची केबल, संदीप भटु पाटील यांची १५०० रुपयांची केबल, आंबालाल रघुनाथ पाटील यांची १५०० रुपयांची केबल, रविंद्र दशरथ पाटील यांची ७०० रुपयांची केबल, अरुण दशरथ पाटील यांची ५०० रुपयांची केबल आणि रविंद्र काशिनाथ पाटील यांची ६०० रुपये किमतीची केबल अशा एकूण १९,५५० रुपये किमतीच्या वायरची चोरी झाली आहे.
याप्रकरणी गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३३/२०२६ नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कैलास तावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी झाल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.









