Maharashtra weather update : गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीने जोर धार धरला असून किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे . देशाच्या उत्तरेकडील असणाऱ्या बहुतांश राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. त्याटा थेट परिणाम महाराष्ट्रावरही झाला असून, राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. दरम्यान उत्तरेकडील मैदानी भागांप्रमाणंच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान १० अंशांवर पोहोचलं असतानाही पावसाचं सावट चिंतेत भर टाकत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ तासात राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सौम्य सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्राचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या अरबी समुद्राच्या आग्नेयेकडे चक्राकार वारे वाहत असल्यने ही स्थिती उदभवल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली असून, इथं पारा ५ अंशांवर पोहोचला आहे, तर सर्वाधिक तापमानाची नोंद ही रत्नागिरीत करण्यात आली असून, इथं तापमान ३३ अंशांपर्यंत राहील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
तसेच उत्तर भारतातील पर्वतीय क्षेत्रांमध्ये थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढत असून, हिमाचल प्रदेशातील शिमला, स्पितीचं खोरं आणि इतर क्षेत्रांमध्ये जोरदार हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर, काश्मीरमध्येही पारा उणे १० अंशांखाली आला असून, कोऱ्यामध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ज्यामुळं नजीकच्या भागांमध्येही किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत थंडीचा जोर कमी होण्याचा अंदाज किंवा तशी शक्यताही नसून, पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं देशभरातील हवामानात हा बदल होत असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं पर्वतीय भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसह प्रशासनालाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.