पाचोरा शहरात अवैधरित्या गॅस सिलेंडरच्या साठ्यावर धाड; ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त…!

---Advertisement---

 

पाचोरा शहरालगतच्या जारगाव चौफुली परिसरात अवैधरित्या गॅस सिलेंडरचा साठा करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रकारावर अखेर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. पुरवठा विभाग व पाचोरा पोलिसांनी संयुक्तरीत्या टाकलेल्या धाडीत तब्बल ६२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अकबर मशिदखान (वय -३८, रा. जारगाव चौफुली) यास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांना जारगाव चौफुली येथे एका घराखालील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस सिलेंडर साठवण्यात आल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने माहितीची खातरजमा करून त्यांनी तात्काळ पाचोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी यांना कारवाईसाठी पाठविण्यात आले.

शनिवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान पुरवठा विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी घराखालील गोडाऊनमध्ये एचपी, GAS-ONE, BPCL आणि HPCL कंपनीचे एकूण १८ गॅस सिलेंडर आढळून आले. त्यामध्ये १४ व्यवसायिक व ४ घरगुती सिलेंडरचा समावेश होता. तसेच ९ भरलेले आणि ९ रिकामे सिलेंडर जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान अकबर मशिदखान हा घटनास्थळी आढळून आला. चौकशी केली असता संबंधित सिलेंडर स्वतःच्या मालकीचे असल्याची कबुली त्याने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पंचांसमक्ष पंचनामा करून सर्व सिलेंडर जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यातआरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८७ तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ अन्वये पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील आरोपीस नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे

सदर कारवाईत पुरवठा निरीक्षक राहुल पवार, लिपिक शुभम सपकाळे, सोमनाथ मिस्तरी, भाग्यश्री देवढे  तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दिलीप वाघमोडे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---